गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळक
Lyricist: Rev. N.V. Tilak
Book: Upasana Sangeet
Song No.: 12
The Greatness and Majesty of God
देत अमित सुख दूर करोनी अघजनित्यास नृशंसा, ।
प्रभु जगदधिपति मधु तव शंसा. ॥ ध्रु० ॥
सकल महीतल, शैल, दरी, जल वर्णिति तव यश देवा, ।
तरुवर डुलत लतेसह; पाहुन जणुं खगवृंद वदे ‘वा ‘ ! ॥ १ ॥
चंचल पवन जशी तव अंगुलि फिरत तसा जगिं नाचे, ।
तव आदेशें आगम तेवि अनागम ह्या तपनाचें. ॥ २ ॥
गाढ जलाशयतलिं निद्रित तूं करिशी मीनकुलातें, ।
अन्नद रक्षक तूं मनुजातें हरिगजमृगनकुलातें. ॥ ३ ॥
सृजिली, सदया, लवभर धूली घेउन ही नरजाती, ।
महती, देवा, दिधली इतरा कवणा ये न रजा ती. ॥ ४ ॥
स्तब्ध मती हो जों जों जगतीं मी तव विभव पहातों, ।
कीट खरा मी समजुन मदहंकृतिची हो अपहा तों. ॥ ५ ॥
एक मनानें किति मीं ध्यावें, एक मुखें किति गावें ? ।
तव आशीर्वच नसतां कैसें भूतिस तव उमगावें ? ॥ ६ ॥
अंतरिं बाहिर दयित दिसावा बाल तुझा मज, येशू , ।
संतत तत्कर धरुन रिघावें वारुन इहविषयेषु. ॥ ७ ॥
जय जगदीश ! निरंजन आत्मन् ! जय जय विभुसंताना ! ।
हे त्रितया जय ! आश्रय भुवनीं तव हो, प्रभु, संतांना. ॥ ८ ॥
Download Lyrics👇

